नागपूर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी बैठकीत नेत्यांना खाण्यासाठी काजू आणि बदामांची व्यवस्था करण्यात आली होती . या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना मंत्री आणि सरकारी अधिकारी काजू, बदामावर ताव मारत असल्याच्या मुद्द्यावरुन संताप अनेकांनी व्यक्त केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. साधारणपणे आपल्याकडे पद्धत आहे बैठकांमध्ये प्रशासन ड्रायफूट आणून ठेवते. अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. पण जाणीवपूर्वक दुष्काळ आहे म्हणून असं कोणीतरी करतंय, हे म्हणणे योग्य नाही. पण प्रशासनाने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि संवेदनशीलपणे वागले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने पिकं खराब झाली आहेत. उतारा कमी येईल, अशी परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी याबाबत चर्चा करुन आपापल्या जिल्ह्यात आढावा घेऊन तयारी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. पुढच्या आठवडाभरात आम्ही प्राथमिक आढावा आणि पंचनामे करुन मदत करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यानच्या काळात कर्जमाफीचे काम सुरु आहे. तीन याद्या झाल्या आहेत, उर्वरित काम वेगाने करण्याचे प्रक्रिया सुरु आहे. सर्वतोपरी शेतकऱ्यांना तातडीची मदत केली जाईल. पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. यावेळी अल निनो संकटामुळे आपण वैरण विकास कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळे चाऱ्याची टंचाई असेल तिकडे व्यवस्था केली जाईल. संध्याकाळच्या वेळी शेतीसाठी अतिरिक्त वीज देण्याची तजवीज केली आहे. सगळ्या भागात आपण अतिरिक्त वीज देत आहोत. ज्याठिकाणी विहीराला पाणी आहे तिथली पिकं वाचवता येतील. दुष्काळी उपाययोजना करुन शेतकऱ्यांना किमान काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विरोधक दुष्काळी परिस्थितीचे राजकारण करत आहेत: देवेंद्र फडणवीस
विरोधकांना माहिती आहे, हे सगळे जे जीआर आहेत दुष्काळाचे, त्याप्रमाणे काय करायचे आहे, त्याचे नियम आहेत. तरच एनडीआरएफचे पैसे मिळतात. पण आपण न थांबता राज्य सरकारकडून मदत करतो, त्यानंतर एनडीआरएफचे पैसे क्लेम करतो. विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची वाईट सवय लागली आहे. पण केवळ राजकारणं करणे योग्य नाही. जिथे विहिरींना पाणी आहे, तिथे रबी पिकांचे नियोजन करता येईल. अजून ठरवलं नाही, पण शक्यतो काही भाग जो प्रचंड कोरडा आहे. यावेळी सुदैवाने मोठ्या धरणांमध्ये चांगलं पाणी आहे, पण मराठवाड्यातील छोटी धरणं पाणी कमी आहे, म्हणून अशा भागात पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होऊ नये, पाणी राखून ठेवावे लागते, मोठ्या धरणातही पाणी राखून ठेवलं आहे. जोपर्यंत पुढचा अंदाज येत नाही तोपर्यंत राखून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.